Blogs:काचबिंदू -एक छुपा दृष्टी चोर.

23-Oct-2019 12:44 AM


पूर्वसूचना न देता चोरपावलाने येऊन संपूर्ण दृष्टी नकळत हिरावून घेणाऱ्या काचबिंदू या आजाराबद्दल आज अनेक गैरसमज आहेत. काचबिंदू म्हणजे काय, हा प्रश्न सर्वसाधारणपणे ८०-९० टक्के लोकांना पडत असावा! यालाकारण म्हणजे सामान्यांमध्ये असणारी काचबिंदूविषयीची अनभिज्ञता.! 
                भारतात १५ लाख लोक काचबिंदूमुळे अंध व परावलंबी झालेले असून दरवर्षी हा आकडा लाखोंनी वाढत आहे. जागतिक अंधत्व प्रतिबंधक संस्थेच्या अहवालानुसार जगामध्ये एकंदर अंधात्वांच्या २०% अंधत्व काचबिंदूमुळे येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील ३.९% लोकांना काचबिंदू होतो. संपूर्णपणे टाळता येणारे हे अंधत्व केवळ अजाणतेपणामुळे आपल्याला स्वीकारावे लागत आहे

                काचबिंदू म्हणजे डोळ्याची नस किंवा ऑप्टिक नर्व्ह शुष्क होण्याची प्रक्रिया! यामुळे डोळ्यातून मेंदूकडे जाणारे तंतू काम करणे बंद करतात व दृष्टी अधू होत जाते. डोळ्यांमध्ये अक्विय्स ह्युमर नावाचे द्रवपदार्थ असतो. त्याचे डोळ्यांमधील अभिसरण व निचरा नीट न झाल्यास डोळ्यातील दाब वाढतो व ऑप्टिक नर्व्हला कायमस्वरूपी इजा निर्माण होते. त्यामुळे आपल्याला सभोवतालच्या नजरेत म्हणजे पेरिफेरल व्हिजनमध्ये दृष्टिदोष निर्माण होतात व म्हणूनच ते आपल्या लक्षातच येत नाही. त्याचप्रमाणे डोळ्यातील दाब हळूहळू वाढल्यामुळे डोळ्यास त्याची सवय होते व डोळा दुखणे, त्रास होणे, लाल होणे असे काहीही घडत नाही. लक्षात न आल्यास ऑप्टिक नर्व्ह हळूहळू काम करणे बंद करते व पुंगळीतून पाहिल्याप्रमाणे कालांतराने थोडीच नजर शिल्लक राहते. हळूहळू ही नजरदेखील लुप्त होते व उरतो तो डोळ्यांसमोर  संपूर्ण काळोख! 
आपल्याला काचबिंदू झाला आहे हे आपल्या लक्षात येत नाही, हेच या आजाराचे विदारक सत्य आहे. काचबिंदू कुणालाही होऊ शकतो. परंतु काही लोकांना काचबिंदू होण्याची शक्यता फार जास्त असते. आपले वय चाळिशीच्या पुढे असल्यास, डायबेटिस असल्यास, जाड चष्मा असल्यास, दीर्घ काळ दमा, संधिवात यासाठी स्टेरॉइड्स घेतल्यास, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनुवांशिकता असल्यास काचबिंदू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. काचबिंदूचे गांभीर्य लक्षात घेता चाळीशीनंतर प्रत्येकाने नेत्रतज्ज्ञांकडून काचबिंदूसाठी स्पेशल तपासणी करून घेणे गरजेचे आहे. 

 

काचबिंदूसाठी विशेष तपासण्यामध्ये
१) डोळ्यांतील दाब - टोनोमेट्री 
२) बुबुळांची जाडी - पॅकीमेट्री 
३) बाहुली फैलावून ऑप्टिक नर्व्हची तपासणी 
४) डोळ्यातील द्रव्याचा निचरा होण्याच्या जागेची तपासणी - स्लीट लॅम्प व गोनिओस्कोपी मशीनद्वारे
५) सभोवतालच्या दृष्टीची तपासणी - फिल्ड टेस्ट किंवा पेरिमेट्री तपासणी
६) OCT मशीनव्दारे ऑप्टिक नर्व्हचा 3d स्कॅन व RNFL तपासणी . 
                यांचा समावेश आहे.
                या सर्व प्रकारच्या तपासण्या करून मगच काचबिंदूचे निदान केले जाते. निदान झाल्यास ड्रॉप्स दिले जातात. नियमित स्वरूपातील ड्रॉप्स व नियमित तपासण्या यांनी काचबिंदू नियंत्रणात ठेवता येतो. ज्या वेळी काचबिंदूचे निदान करण्यात येते त्या वेळी जर काही दृष्टिदोष निर्माण झालेला असेल, तर तो दोष किंवा ती नजर आपल्याला परत मिळविता येत नाही; परंतु पुढील प्रक्रिया पूर्णपणे टाळता येते व जी नजर आहे ती वाचविता येते. ड्रॉप्सनी दाब कमी न झाल्यास लेझर थेरपी  किंवा ऑपरेशनदेखील करता येते. 
काचबिंदू प्रामुख्याने या स्वरूपात आढळत असला तरी काही मुलांना जन्मत: तर काही लोकांना अचानकपणे दाब वाढल्याने अॅटॅक येऊन काचबिंदू होऊ शकतो. प्रकार कुठलाही असला तरीही कायमस्वरूपी अंधत्वाकडेच त्याची वाटचाल असते आणि म्हणूनच काहीही त्रास नसला तरी नेत्रतज्ञकडून काचबिंदूसाठी तपासणी करून घेणे गरजेचेच ठरते.

काचबिंदू हि जीर्ण व्याधी आहे याचा परिणाम दोन्ही डोळ्यांवर होतो. काही लक्षणे निर्माण होईपर्यंत दृष्टीक्षेत्रावर  याचे गंभीर परिणाम झालेले असतात किंवा दृष्टी गेलेली असते. काचबिंदूचे सुरुवातीच्या अवस्थेत निदान होणे आणि त्यावरील उपचारच्या साह्याने या गंभीर आजारामुळे येणारे अंधत्व टाळता येते. रुग्ण नियमितपणे तपासण्या व योग्य चिकित्सा घेत असेल तर रुग्णाचे दीर्घकालीन भवितव्य चांगले आहे. रुग्णाने काचबिंदूचे गांभीर्य लक्षात घेवून नेत्रातज्ञाना  सहकार्य करावे काचबिंदू च्या रुग्णाने लक्षात ठेवावे कि काचबिंदू मुळे येणाऱ्या अंधत्वाविरुध्ह लढणाऱ्या पथकामधील नेत्रतज्ञांबरोबर आपण स्वतःसुद्धा एक घटक आहोत.   
काचबिंदू का होतो हे सामान्यजनांप्रमाणेच वैद्यकशास्त्रासही न उलगडलेले कोडे आहे. आधुनिक वैद्यकशास्रातही काचबिंदूचे मुळापासून बरा करण्यासाठी उत्तर नाही. त्यासाठी जागतिक पातळीवर विविध संशोधन प्रकल्प सुरू आहेत. त्यातील अनुवांशिकता शोधून 'जीन-थेरपी'चे वरदान आपणास मिळू शकेल का याविषयी बरेच शास्त्रज्ञ कार्यरत आहेत.  डोळा मध्यवर्ती ठेवून अॅलोपॅथी, होमिओप्याथि, आयुर्वेद, नॅचरोपॅथी, व योगशास्र यांनी एकत्र येवून होलिस्टिक दृष्टीकोनातून यावर उपाय शोधण्याची गरज आहे. योगशास्त्र व ध्यानधारणा यांचा काचबिंदू वर काय परिणाम होतो? योगा व प्राणायाम यामुळे काचबिंदू मुळे येणारे अंधत्व टाळता येईल का? काचबिंदू होवू नये म्हणून आपण काय करू शकतो. काचबिंदू झाल्यास योगशास्राद्वारे कोणती आसने करावी? कोणती करू नयेत? या विषयी योग विद्यापीठ नाशिक च्या अहमदनगर शाखेनेही संशोधन हाती घेतले आहे. अहमदनगर येथील सुंदर नेत्रालयामध्ये ३० योगसाधक गेले दीड महिन्यापासून यावर प्रयोग करत आहेत. हि फक्त सुरुवात आहे आपल्याला अजून खूप काही संशोधन करायची गरज आहे. यामुळे आपल्या पुढील पिढीला काचबिंदू होऊ नये म्हणून नवीन थेरपीचा यातून उगम होऊ शकेल का, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळू शकतील. किंबहुना हे अंधत्व टाळता येण्याचा मार्गही सापडू शकेल व याचा संपूर्ण मानवजातीलाच फायदा होऊ शकेल. 
आज आपल्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, पण लोकांमध्ये जागृती झालेली नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. या विषयी जनजागृती होणे गरजेचे आहे त्यासाठीच हा एक प्रयत्न.